गणपतीपुळे (वैभव पवार) : जिल्हा परिषद रत्नागिरी आयोजित नासा-इस्रो परीक्षा २०२५-२६ मध्ये दैदिप्यमान यश मिळवून संपूर्ण जिल्ह्यातून नासा आणि इस्रो या दोन्ही दौऱ्यांसाठी पात्र ठरलेली वरची निवेंडी तळेपाठ-नेवरेकरवाडी येथील सर्वसामान्य कुटुंबातील कन्या आणि मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयाची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु. वृणाली नितीन पाटील ही १२ नोव्हेंबर रोजी अमेरिकेतील नामांकित अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ (NASA) अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. मे महिन्यात बंगळुरू येथील इस्रो संशोधन दौरा यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर आता १२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत ती अमेरिकेत अंतराळ संशोधनाचे धडे गिरवणार आहे. बालपणापासूनच अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या वृणालीने केवळ स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर कला, क्रीडा, सांस्कृतिक तसेच मैदानी खेळांमध्येही विशेष प्राविण्य मिळवत स्वतःचा ठसा उमटवला आहे.
तिच्या या अद्वितीय यशामुळे वरची निवेंडी, मालगुंड, गणपतीपुळे परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात तिच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत असून, या यशामागे आई नेत्रा व वडील नितीन वसंत पाटील यांचे भक्कम पाठबळ, विद्यालयातील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि ग्रामस्थांचे निरंतर प्रोत्साहन लाभल्याचे तिने कृतज्ञतापूर्वक नमूद केले असून, कोकणातील एका ग्रामीण कन्येने घेतलेली ही उत्तुंग जागतिक झेप सर्व विद्यार्थ्यांसाठी मोठी प्रेरणादायी ठरली आहे.





