रमेश शिंदे/ भडकंबा : साखरपा बसस्थानकात एसटी बस फलाटावर लावत असताना अचानक झालेल्या दुर्घटनेने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. बसच्या पुढील चाकाचा जोरदार धक्का लागल्याने एका तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. ही घटना रविवार 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12.45 च्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर डेपोची रत्नागिरी-कोल्हापूर एमएच १२ झेड ई ८९५३ क्रमांकाची शिवाई बस साखरपा बसस्थानकातील फलाटावर लावण्यात येत होती. याचवेळी मोर्डे-लाडवाडी येथील संजय रामचंद्र मांडवकर (वय ३८) यांचा तोल गेल्याने ते बसच्या पुढील बाजूला आले. त्यांना बसच्या पुढील चाकाचा जोरदार धक्का लागल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर बसस्थानक परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल पावसकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोरे यांच्या मदतीने जखमी संजय मांडवकर यांना तातडीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. महेश चाचणे ( रा. हुपरी) असे बस चालकाचे नाव आहे.
प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या पायाला झालेली दुखापत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना रत्नागिरी येथे हलविण्यात आले. दरम्यान, नेमका अपघात कोणत्या परिस्थितीत घडला, याची शहानिशा साखरपा पोलीस करीत आहेत.
साखरपा बसस्थानकात एसटीच्या चाकाखाली तरुण सापडला; पायावरून चाक गेले
Leave a Comment





