रत्नागिरी : नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत शहर बाजारपेठ हद्दीत सुमारे ३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक भाजी मार्केटच्या नूतन इमारतीचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण आणि फित कापून उत्साहात संपन्न झाले. या इमारतीमुळे बाजारपेठेतील कामकाज अधिक सुसूत्रित होऊन नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी स्थानिक नागरिकांच्या लोकभावनेचा आदर करत या नूतन भाजी मार्केटचे नामकरण ‘श्री नवलाई देवी भाजी मंडई’ असे करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. तसेच स्टॉल वाटप प्रक्रियेत अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या जुन्या विक्रेत्यांना विश्वासात घेऊन त्यांना लिलाव प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे आणि कोणत्याही परिस्थितीत जुन्या व्यावसायिकांवर अथवा गरजू घटकांवर अन्याय होणार नाही, याची काटेकोर खबरदारी घ्यावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
या सोहळ्यास नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, मुख्याधिकारी वैभव गारवे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, बंड्या साळवी, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात पालकमंत्र्यांनी शहरातील इतर विकासकामांचाही सविस्तर आढावा घेतला. स्मार्ट सिटी योजनेतील शिवाजीनगर बस स्टॉपचे नामकरण तातडीने ‘छत्रपती शिवाजी महाराज स्टॉप’ करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. याशिवाय शहरात नव्याने दाखल होणाऱ्या २० वाहनांच्या देखभालीसाठी अतिरिक्त खर्च टाळत नवीन ट्रक टर्मिनलच्या जागेचाच वापर करावा, जेणेकरून पालिकेच्या निधीची बचत होईल, असे त्यांनी नमूद केले. शहरातील इमारतींच्या मॅपिंगनंतर नगरपालिकेच्या तिजोरीत दरवर्षी साडेसात ते आठ कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल जमा होणार असून हा निधी केवळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वापरला जाईल, असे सांगतानाच स्वच्छता कंत्राटदारांनी सर्व सफाई कामगारांना वेळेवर वेतन, गणवेश आणि मूलभूत मानवी हक्क पुरवणे बंधनकारक असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. कार्यक्रमाचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाला; मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी प्रास्ताविक केले, तर पूर्वा पेठे यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले.





