सायबर फसवणुकीपासून सावध राहा; अनोळखी लिंकवर क्लिक करू नका
रत्नागिरी : डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. अनोळखी व्यक्तींकडून येणारे फोन, संशयास्पद लिंक, मेसेज किंवा व्हॉट्सॲपवरील अनधिकृत संदेशांना प्रतिसाद देणे टाळावे. एका चुकीच्या क्लिकमुळे मोबाईल तसेच वैयक्तिक आणि आर्थिक माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती जाऊ शकते. त्यामुळे स्मार्टफोन वापरताना नागरिकांनी, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी, अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयातर्फे खेडशी येथील प.पू. बाळसत्याधारी महाराज व्यसनमुक्ती सेवा केंद्र येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त आयोजित ‘लोकसंवाद-२०२६’ कार्यक्रमात त्या नागरिकांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. यावेळी प.पू. बाळसत्याधारी महाराज, मिरजोळेचे उपसरपंच राहुल पवार, ‘माय भारत’चे जिल्हा युवा अधिकारी सम्राट पाटील, खेडशीचे माजी सरपंच भिकाजी गावडे, उद्योजक अरविंद माने, मुख्याध्यापक सुभाष पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाची माहिती दिल्यानंतर सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुतार यांनी सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धतींची माहिती देत नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. अनोळखी क्रमांकावरून आलेले मेसेज, संशयास्पद लिंक किंवा व्हॉट्सॲपवर प्राप्त झालेल्या अनधिकृत संदेशांवर क्लिक करू नये. बँक खाते, एटीएम, ओटीपी, आधार कार्ड यांसह वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये. वैयक्तिक छायाचित्रे किंवा ओळखपत्रांचा गैरवापर करून बनावट खाती उघडणे अथवा आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार घडत असल्याचे त्यांनी सांगितले.
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली धमकावणे, बनावट पोलीस अधिकारी बनून चौकशीच्या बहाण्याने पैसे उकळणे, शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने मोठ्या रकमेची फसवणूक करणे, गॅस बिलाच्या नावाने खोटे संदेश पाठवणे तसेच इन्स्टंट लोन ॲपच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करणे, अशा सायबर गुन्ह्यांच्या विविध प्रकारांची त्यांनी माहिती दिली. रत्नागिरी परिसरात घडलेल्या प्रत्यक्ष घटनांची उदाहरणे देत अशा धमक्या अथवा आमिषांना घाबरून किंवा भुलून कोणतीही आर्थिक कृती करू नये, तसेच संशयास्पद प्रकार घडल्यास कुटुंबीयांशी तातडीने संवाद साधावा, असे त्यांनी सांगितले.
सायबर किंवा आर्थिक फसवणूक झाल्यास नागरिकांनी वेळ न दवडता तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा जवळच्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क करावा. फसवणुकीनंतर त्वरित तक्रार केल्यास संबंधित खात्यात गेलेली रक्कम गोठविण्याच्या प्रक्रियेत मदत होऊ शकते. तंत्रज्ञानाचा वापर करताना जागरूकता, संयम आणि सुरक्षिततेची काळजी घेणे हाच सायबर गुन्ह्यांपासून बचावाचा प्रभावी मार्ग असल्याचे पोलीस निरीक्षक सुतार यांनी स्पष्ट केले.





