रत्नागिरी: गेल्या अकरा दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या भक्ती, चैतन्य आणि आनंदाच्या उत्सवाची शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंगलमय वातावरणात सांगता झाली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या गगनभेदी जयघोषात आणि विसर्जन मिरवणुकांच्या गजरात रत्नागिरीकरांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. शहरासह ग्रामीण भागात या दिवशी अनंत चतुर्दशीचा उत्साह ओसंडून वाहत होता. संपूर्ण जिल्हाभरात मिळून ७२ सार्वजनिक गणेश मंडळांच्या आणि तब्बल ३६ हजार १७५ घरगुती गणेशमूर्तींचे भक्तिभावाने विसर्जन संपन्न झाले.
सकाळपासूनच शहर तसेच खेडोपाड्यातील वातावरण भक्तिमय आणि जल्लोषी बनले होते. दुपारनंतर विविध भागांतून गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका वाजत-गाजत मार्गस्थ झाल्या, तर सायंकाळच्या सुमारास हा जल्लोष अधिकच शिगेला पोहोचला. ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची मुक्त उधळण, कागदी फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांच्या वर्षावात तरुणाई बाप्पाच्या जयघोषावर उत्साहात थिरकताना दिसत होती. लाडक्या दैवताला निरोप देताना भक्तांच्या चेहऱ्यावर उत्सवाचा आनंद असला, तरी बाप्पाची पाठवणी करताना प्रत्येकाच्या डोळ्यांत भावुकतेची स्पष्ट झलक उमटली होती.
गावागावात अनेक कुटुंबांनी घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी एकत्र येत भावपूर्ण मिरवणुका काढल्या. लहानांपासून थोरांपर्यंत संपूर्ण परिवार या निरोप सोहळ्यात भक्तिभावाने सहभागी झाला होता. अनंत चतुर्दशीच्या पावन क्षणी कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत असताना सर्वांनीच बाप्पाला पुढील वर्षी लवकर येण्याची आर्त हाक दिली. रत्नागिरी शहर आणि लगतच्या उपनगरांमध्ये बाप्पाच्या या भव्य विसर्जन मिरवणुका सायंकाळी उशिरापर्यंत अत्यंत उत्साहात व जल्लोषात सुरू होत्या.






