चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गालगत पॅसिफिक हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या परिसरात असलेल्या साई मोटर्स अँड स्पेअर पार्ट्स या दुकानाचे शटर अज्ञात व्यक्तीने हत्याराच्या साहाय्याने उचकटून दुकानातील सुमारे १ लाख ४ हजार ९ रुपये किमतीचा माल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९ वाजल्यापासून २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. मांडकी कासारवाडी, ता. चिपळूण येथील वैभव प्रभाकर डोगरे (४५) यांच्या मालकीचे मुंबई-गोवा महामार्गालगत पॅसिफिक हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या जागेवर साई मोटर्स अँड स्पेअर पार्ट्स नावाचे दुकान व गॅरेज आहे. हे दुकान बंद असताना अज्ञात व्यक्तीने दुकानाचे शटर कोणत्यातरी हत्याराने उचकटून आत प्रवेश केला.
चोरट्याने दुकानात विक्रीसाठी ठेवलेला विविध प्रकारचा ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्सचा माल तसेच रोख रक्कम असा एकूण १ लाख ४ हजार ९ रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. चोरी झालेल्या मालामध्ये Valvoline कंपनीचे ऑईल पॅकिंग बकेट व कॅन, बॉल जॉइंट सेट, बोलेरो टायर रॉड एंड सेट, टेम्पो ट्रॅव्हलर क्लच पॅकिंग सेट, बोलेरो टू-इन-वन क्लच पॅकिंग सेट, बोलेरो मॅक्स पिकअप पॅकिंग एंड सेट, ब्रेक पॅकिंग बूस्टर, ब्रेक पॅकिंग रोटर, ब्रेक लाइनिंग पॅकिंग सेट, डिस्क पॅकिंग रोटर आदी विविध वाहनांचे स्पेअर पार्ट्स आणि ३ हजार रुपये रोख रकमेचा समावेश आहे.
याप्रकरणी वैभव प्रभाकर डोगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा २९ सप्टेंबर रोजी दुपारी ३.२९ वाजता दाखल करण्यात आला असून, या प्रकरणातील आरोपी अद्याप अज्ञात आहे. पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.






