कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांचा पुढाकार
रत्नागिरी : सण-उत्सव, मोर्चे, विविध सार्वजनिक कार्यक्रम आणि कायदा व सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी रात्री-अपरात्री दुर्गम भाग, घनदाट जंगले तसेच मुसळधार पावसात पहारा देणाऱ्या पोलीस जवानांच्या मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. अशा खडतर ठिकाणी बंदोबस्तादरम्यान विश्रांती आणि सुरक्षित निवाऱ्याची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना सहन कराव्या लागणाऱ्या हालअपेष्टा लक्षात घेऊन, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या विशेष पुढाकारातून बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांसाठी अद्ययावत टेंट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पोलीस मुख्यालय येथे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या उपस्थितीत या टेंटची प्रात्यक्षिकांसह प्रत्यक्ष उभारणी करून आतील व्यवस्थेची सविस्तर पाहणी करण्यात आली.
अल-निनोच्या वाढत्या प्रभावामुळे निर्माण झालेली तापमानवाढ, पावसाची अनिश्चितता आणि रत्नागिरी जिल्ह्याची वैशिष्ट्यपूर्ण डोंगराळ व जंगलमय रचना यामुळे पोलिसांना सातत्याने आव्हानात्मक वातावरणात ड्युटी बजावावी लागते. या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी रत्नागिरीच्या भौगोलिक परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस दलाला हे टेंट तातडीने मंजूर केले असून, त्याबद्दल बगाटे यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत. निसर्गाचा लहरीपणा आणि प्रतिकूल हवामानाचा मारा सहन करणाऱ्या बंदोबस्तावरील अंमलदारांना या टेंटमुळे सुरक्षित आश्रय मिळणार असून, विशेषतः संवेदनशील आणि आडवळणी भागांत कर्तव्य बजावणे आता अधिक सुसह्य होणार आहे. कर्तव्यावर तैनात असलेल्या जवानांच्या कल्याणासाठी उचललेले हे पाऊल पोलीस वर्तुळात मोठे दिलासादायक ठरले आहे.






