गणपतीपुळे (वैभव पवार) : जागतिक कीर्तीचे पर्यटन क्षेत्र तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जयगड पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली असून, येथे तैनात होमगार्ड जवानांची प्रभावी कामगिरी सध्या कौतुकास्पद ठरत आहे. जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहा होमगार्ड जवान समुद्रकिनाऱ्यावर चोख कर्तव्य बजावत आहेत. समुद्राच्या खोल पाण्यात जाणाऱ्या पर्यटकांवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांना धोक्याची पूर्वकल्पना देणे, केवळ कमी पाण्यातच स्नानाचा आनंद घेण्याबाबत सातत्याने सूचना देणे आणि संभाव्य दुर्घटना रोखणे यासाठी हे जवान दिवसरात्र सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. भूतकाळात समुद्रात घडलेल्या दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि कोणी बुडत असल्यास तात्काळ बचावकार्य करता यावे यासाठी जयगड पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ‘सी-प्रहरी’ सायकलवरून संपूर्ण चौपाटीवर नियमित गस्त घातली जात आहे.
केवळ गणपतीपुळेच नव्हे, तर लगतच्या संवेदनशील मालगुंड आणि उंडी समुद्रकिनाऱ्यावरही जयगड पोलीस ठाण्याकडून होमगार्ड पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलीस प्रशासनाने होमगार्ड्सचे संख्याबळ वाढविल्यामुळे गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक, देवस्थानचे सुरक्षा रक्षक आणि वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक यांच्यात उत्तम समन्वय निर्माण झाला असून किनारपट्टीवरील सुरक्षितता अधिक भक्कम झाली आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रामाणिकपणे बजावल्या जाणाऱ्या या खऱ्याखुऱ्या कर्तव्यामुळे पर्यटकांसह स्थानिक व्यावसायिक आणि ग्रामस्थांमधूनही मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.






