३ अग्निशमन बंबांना लागला ५-६ तासांचा वेळ
संगमेश्वर/एजाज पटेल : संगमेश्वर – देवरुख मुख्य मार्गावर लोवले ग्रामपंचायत हद्दीत रामविलास भालू पासवान यांच्या भंगार साठ्याला रविवारी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही, मात्र विस्तीर्ण जागेत पसरलेल्या या भंगार साठ्याने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. या आगीची तीव्रता इतकी भीषण होती की परिसरात दूरवर आगीचे लोळ व धुराचे साम्राज्य पसरले होते. घटनेची माहिती मिळताच दाखल झालेल्या ३ अग्निशमन बंबांना आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी तब्बल ५ ते ६ तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
घटनेची माहिती मिळताच लोवले येथील ग्राम महसूल अधिकारी संदेश घाग यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा केला व मालक रामविलास पासवान यांचा विस्तृत जवाब नोंदवून घेतला. पंचनाम्यानुसार आगीत ४ लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक एम एच -०८-एच-१५५६, ४ लाख रुपयांची प्लास्टिक प्रेस मशीन, १२ लाख रुपये किमतीचे ६० टन प्लास्टिक भंगार आणि ३ लाख रुपयांचे १० टन अतिरिक्त प्लास्टिक भंगार जळून भस्मसात झाले आहे. याशिवाय ३ लाख रुपयांचे २ टन लोनावक कोकण, २ लाख ५० हजार रुपयांचा लोखंडी पत्रा शेड, १ लाख ५० हजार रुपयांची ग्राइंडिंग मशीन, ६० हजार रुपयांचे प्लास्टिक प्रेस बंडल, ५० हजार रुपयांचे लोखंडी पत्र्यांचे भंगार आणि २५ हजार रुपयांचा बोरिंग पंप अशा विविध साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे.
ग्राम महसूल अधिकारी संदेश घाग यांनी दिलेल्या अहवालानुसार या आगीत एकूण ३१ लाख ३५ हजार रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सदर जागा मालकी हक्काची असून आगीची झळ नजीकच्या राहत्या घराला बसली नाही, तसेच कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची नोंद घेण्यात आली असून आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे.





