रत्नागिरी: येथील देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण प्रदेशातील पर्यटन – रोजगाराच्या संधी या विषयावर पर्यटन उद्योगातील गाइड श्रीवल्लभ साठे यांनी मार्गदर्शन केले.
ट्रॅव्हल अँड टुरिझम ॲड-ऑन कोर्सअंतर्गत द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हे चर्चासत्र आयोजित केले होते. साठे यांनी विद्यार्थ्यांना कोकणातील पर्यटन क्षेत्रातील विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.
कोकण प्रदेशाला लाभलेला निसर्ग, समुद्रकिनारे, किल्ले, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा, स्थानिक खाद्यसंस्कृती तसेच ग्रामीण पर्यटन यामुळे पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. पर्यटन मार्गदर्शक, ट्रॅव्हल एजन्सी, हॉटेल व्यवस्थापन, होमस्टे, टूर ऑपरेटर, पर्यटन नियोजन, वाहतूक सेवा आणि डिजिटल पर्यटन प्रचार अशा विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी मिळू शकतात, असे श्री. साठे यांनी सांगितले.
पर्यटन क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी संवादकौशल्य, स्थानिक इतिहास व संस्कृतीचे ज्ञान, परकीय भाषांचे ज्ञान, डिजिटल कौशल्ये आणि ग्राहकाभिमुख दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी उपलब्ध पर्यटनसंधींचा अभ्यास करून कौशल्यविकासावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या सौ. मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. विनय बावदाने, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. सौ. राखी जाधव, प्रा. वैभव कीर उपस्थित होते.





