रत्नागिरी: शहरात कौटुंबिक विश्वासाला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली असून, मावशीसोबत गेल्या पाच वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने अल्पवयीन भाचीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डिसेंबर २०२५ पासून पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या मावशीकडे वास्तव्यास होती.
मावशीचा जोडीदार असलेला आरोपी राज मनोज घोरपडे हा पीडितेला क्लासला नेण्या-आणण्याचे काम करत असल्याने तिच्याशी कौटुंबिक ओळख निर्माण झाली होती. याच ओळखीचा व विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने ३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी दोनच्या सुमारास ‘तू काम करून थकली आहेस, थोडा वेळ आराम कर’ असा बनाव रचून तिला एका लॉजवर नेले. तेथील एका खोलीत आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केले. इतकेच नव्हे तर घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास त्याचे रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची थेट धमकी देऊन तिचे तोंड बंद ठेवण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित मुलीने धैर्याने पुढे येत पोलिसांकडे दाद मागितली.
पीडितेच्या तक्रारीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यासह संबंधित गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. सदर गुन्हा ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून, या गंभीर प्रकरणाचा पुढील सखोल तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका देसाई करत आहेत.







