राजापूर (तुषार पाचलकर): बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात ओढवू शकणाऱ्या संभाव्य टंचाईची जाणीव ठेवून प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि जलसंधारणाची चळवळ उभारणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे अधिकारी घाटविलकर यांनी केले. महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा विभाग आणि दिवाळवाडी येथील राधाकृष्ण नवरात्रोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जनसेवा संकल्प अभियानांतर्गत’ विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष चित्रकला स्पर्धेच्या प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना घाटविलकर यांनी स्पष्ट केले की, निसर्गातील अनपेक्षित बदलांमुळे भविष्यात दुष्काळाची तीव्रता वाढू शकते, त्यामुळे पावसाचे पाणी जास्तीत जास्त अडवून जमिनीत जिरवणे, पाण्याचा अपव्यय रोखणे आणि जलस्रोतांचे जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. केवळ शासनाच्या प्रयत्नांवर अवलंबून न राहता नागरिकांनीही जलसंवर्धनाला जनआंदोलनाचे स्वरूप दिले पाहिजे, तरच उद्याची पाण्याची गरज सुरक्षित राहील, असा सूर या वेळी मान्यवरांनी आळवला.
या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ आणि ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ अशा सामाजिक व पर्यावरणपूरक विषयांवर आपल्या कल्पक कुंचल्यातून प्रभावी चित्रे रेखाटली. चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मांडलेले जलसंधारणाचे विविध पैलू उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. या उपक्रमामुळे लहान वयातच मुलांमध्ये पर्यावरण आणि जलसाठ्यांविषयी सजगता निर्माण होण्यास मोठी मदत झाली.
कार्यक्रमाला जलसंपदा विभागाचे अधिकारी घाटविलकर यांच्यासह बारामती कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. संदीप कांबळे व त्यांचे सहकारी वृंद तसेच श्री. गंगाधर नारकर आदी मान्यवर उपस्थित होते. दिवाळवाडी परिसरातील विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा जनजागृतीपर उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.






