रत्नागिरी: कोकणातील प्रसिद्ध हापूस आंबा, मासळी यांसह नाशवंत कृषी आणि सागरी उत्पादनांना देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कोकण रेल्वेने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. या अंतर्गत राज्यातील पहिल्या रेल्वे शीतगृहाची (कोल्ड स्टोरेज) उभारणी रत्नागिरी येथे करण्यात येणार असून, यामुळे कोकणातील शेतकरी आणि मच्छीमारांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोकण रेल्वे आणि केंद्रीय वखार महामंडळ (CWC) यांच्या संयुक्त सहकार्याने हा प्रकल्प साकारला जात असून, या शीतगृहाची क्षमता तब्बल दोन हजार मेट्रिक टन इतकी असणार आहे.
कोकण किनारपट्टीवरून मोठ्या प्रमाणावर हापूस आंबा, विविध फळे आणि ताज्या मासळीची वाहतूक केली जाते. मात्र, पुरेशा साठवणुकीच्या आणि शीतसाखळीच्या (कोल्ड चेन) अभावामुळे नाशवंत उत्पादनांचे मोठे नुकसान होत असे किंवा उत्पादकांना अत्यंत कमी भावात माल विकावा लागत असे. ही समस्या लक्षात घेऊन कोकण रेल्वेने महसूल वाटपाच्या (रेव्हेन्यू शेअरिंग) तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जागा कोकण रेल्वे उपलब्ध करून देणार असून, प्रत्यक्ष शीतगृहाची आधुनिक उभारणी आणि आर्थिक गुंतवणूक केंद्रीय वखार महामंडळामार्फत केली जाणार आहे.
रत्नागिरीत उभारले जाणारे हे अत्याधुनिक शीतगृह आगामी दीड वर्षात पूर्ण करून प्रत्यक्ष सेवेत आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या रेल्वे शीतगृहामुळे उत्पादकांना आपला माल दीर्घकाळ चांगल्या स्थितीत टिकवून ठेवता येणार असून, रेल्वेच्या माध्यमातून तो थेट मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांमध्ये तसेच निर्यात केंद्रांपर्यंत वेगाने आणि गुणवत्तेसह पोहोचवणे शक्य होणार आहे. कोकण रेल्वे आणि केंद्रीय वखार महामंडळाच्या या ऐतिहासिक करारामुळे कोकणातील कृषी, फलोत्पादन आणि मत्स्यव्यवसायाला मोठी चालना मिळणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.




