लांजा/अरबाज नेवरेकर : लांजा शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर घालणारी कामगिरी सौरभ अनंत आयरे यांनी केली आहे. लांजा नागरी सहकारी पतसंस्थेचे अभ्यासू संचालक अनंत आयरे यांचे चिरंजीव सौरभ आयरे यांनी उद्यानविद्या (Horticulture) शाखेतील मळा पिके, मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पती (Plantation, Spices, Medicinal and Aromatic Crops) या विषयात विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशामुळे लांज्याच्या नावलौकिकात भर पडली आहे.
शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत सौरभ आयरे यांनी संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण शैक्षणिक टप्पा गाठला आहे. कृषिप्रधान कोकणच्या दृष्टीने उद्यानविद्या हे अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र मानले जाते. विशेषतः मळा पिके, मसाला पिके तसेच औषधी व सुगंधी वनस्पतींचा अभ्यास आणि संशोधन यांना कृषी क्षेत्राच्या विकासात विशेष महत्त्व आहे. अशा विषयात उच्च शैक्षणिक पात्रता संपादन करणे ही निश्चितच गौरवास्पद बाब आहे.
लांजा शहरातील सहकार क्षेत्रात अभ्यासू संचालक म्हणून ओळख असलेले अनंत आयरे यांचे चिरंजीव सौरभ यांनी आपल्या शैक्षणिक प्रगतीतून कुटुंबासह लांजा शहराचा गौरव वाढवला आहे. उच्च शिक्षणातील सातत्य, संशोधनाची आवड, जिद्द आणि परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे.
आज विविध क्षेत्रांत लांज्यातील तरुण आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना सौरभ आयरे यांनी संशोधनासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात मिळवलेले यश विशेष उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या तसेच संशोधन क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळणार आहे.
सौरभ आयरे यांनी संपादन केलेल्या या पीएच.डी. पदवीबद्दल लांजा शहरातील शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
लांज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; सौरभ अनंत आयरे यांनी संपादन केली पीएच.डी. पदवी
Leave a Comment






