लांजा (अरबाज नेवरेकर): गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर लांजा पोलीस ठाण्याने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत कुवे येथील श्री सिद्धिविनायक सेवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाचा उत्सव पूर्णपणे डीजेमुक्त पद्धतीने साजरा करण्याचा आदर्श संकल्प केला आहे. या पर्यावरणपूरक आणि शांतताप्रिय भूमिकेचे कौतुक करत लांजा पोलिसांच्या वतीने मंडळाचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
लांजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरकरवाडी, कुवे येथील श्री सिद्धिविनायक सेवा मंडळाला २४ सप्टेंबर रोजी दुपारी भेट देण्यात आली. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत सविस्तर बैठक पार पडली. यावेळी विसर्जन मिरवणुकीचा मार्ग, भाविक व नागरिकांची सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था याविषयी सविस्तर चर्चा करून प्रशासनाकडून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. तसेच शासनाने निर्धारित केलेल्या अटी व नियमांचे तंतोतंत पालन करून ध्वनीप्रदूषण टाळण्याचे आवाहनही करण्यात आले.
पोलीस प्रशासनाच्या या आवाहनाला मान देऊन श्री सिद्धिविनायक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यंदा डीजेचा वापर न करता विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला असून, तसे लेखी पत्र लांजा पोलीस ठाण्यात सादर केले. मंडळाच्या या सामाजिक दायित्वाची दखल घेत पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन आगामी उत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. सिद्धिविनायक मंडळाच्या या डीजेमुक्त उत्सवाच्या निर्णयाचे परिसरातून मोठे कौतुक होत आहे.





