लांजा (अरबाज नेवरेकर): मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत धोकादायक ठरणाऱ्या अंजनारी घाट परिसरात वारंवार घडणाऱ्या भीषण अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अखेर प्रशासनाकडून गतिरोधक (स्पीड ब्रेकर) उभारणीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या भागात वाढत्या अपघातांचे गांभीर्य ओळखून तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, यासाठी माजी सरपंच रविकांत शिखरे यांनी स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन संबंधित यंत्रणेकडे सातत्याने जोरदार पाठपुरावा लावून धरला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाल्याची अधिकृत माहिती रविकांत शिखरे यांनी दिली आहे.
या राष्ट्रीय महामार्गावरून दररोज अहोरात्र वाहनांची प्रचंड वर्दळ सुरू असते. मात्र, अंजनारी घाटाच्या तीव्र उतारावर आणि वळणांवर भरधाव वेगाने धावणाऱ्या गाड्यांमुळे येथे सातत्याने अपघातांची मालिका सुरू होती. या धोकादायक परिस्थितीमुळे प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांच्या जीविताचा प्रश्न ऐरणीवर आला होता. घाटातील वाहनांच्या अनिर्बंध वेगाला वेसण घालण्यासाठी तिथे तात्काळ गतिरोधक बसवण्यात यावेत, अशी आग्रही मागणी स्थानिकांमधून मोठ्या प्रमाणावर लावून धरण्यात येत होती.
या अपघाती धोक्याची तीव्रता प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी माजी सरपंच रविकांत शिखरे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर संबंधित यंत्रणेने या मागणीची दखल घेत प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे. या अपघातप्रवण क्षेत्रात गतिरोधक उभारले जात असल्याने आता वाहनांच्या वेगावर प्रभावी नियंत्रण मिळून संभाव्य दुर्घटना टळतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. गतिरोधक उभारणीमुळे परिसरातील जनतेमधून मोठे समाधान व्यक्त होत असून, घाट परिसरातून प्रवास करताना वाहनचालकांनीही वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वाहने मर्यादित वेगाने चालवावीत, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.




