चिपळूण : तालुक्यातील मांडकी खांबेवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी दोन बंद घरांचे दरवाजे तोडून घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत चांदीचे विविध दागिने, पूजेचे साहित्य आणि रोख रकमेसह एकूण ३६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध ३१ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश काशिनाथ पवार (वय ६५, सध्या रा. कुरार व्हिलेज, मालाड पूर्व, मुंबई; मूळ रा. मांडकी खांबेवाडी, ता. चिपळूण) यांचे मांडकी खांबेवाडी येथे घर आहे. २२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजल्यापासून ३० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कोयंडा हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले चांदीचे ताट, पेला, उंदराची मूर्ती, करंडा, दुर्वामाळ, निरंजन, जानवे, जास्वंद फूल आणि मोदक असे चांदीचे विविध दागिने व पूजेचे साहित्य, तसेच पिवळसर रंगाच्या गुल्लकमध्ये ठेवलेली १० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
याच परिसरात राहणारे संतोष नथुराम निमनकर यांच्या बंद घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेली रोख रक्कम चोरून नेली. अशा प्रकारे दोन्ही घरांमध्ये चोरी करून चोरट्यांनी ऐवज लंपास केला.
या घटनेप्रकरणी रमेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) नुसार ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १.२६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही बंद घरांमध्ये चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.





