दाभोळे / सिकंदर फरास: प्राथमिक आरोग्य केंद्र देवळे अंतर्गत उपकेंद्र दाभोळे बौद्धवाडी येथे आज माझे गाव आरोग्य संपन्न गाव कृती दल समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीची सुरुवात उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करत करण्यात आली. त्यानंतर देवळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक प्रशांत कांबळे यांनी उपकेंद्राच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
उपकेंद्रातून लोकांपर्यंत पोहोचवल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती देताना त्यांनी परिसरातील कुष्ठरोग व टीबी रुग्णांची संख्या आणि त्यांच्या पूर्ण बरे होण्याच्या प्रमाणात झालेली वाढ उपस्थितांसमोर मांडली. तसेच नागरिकांना उपचारादरम्यान आवश्यक असणाऱ्या आभा कार्ड वाटपाची माहिती देताना आतापर्यंत तब्बल २३३७ नागरिकांपर्यंत हे कार्ड पोहोचवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दाभोळे उपकेंद्रात नुकतीच तालुक्यात प्रथमच यशस्वी प्रसूती पार पडल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली. ही अभिमानास्पद माहिती मिळताच माजी उपसरपंच किरण दाभोळकर आणि महिला प्रतिनिधींनी आरोग्यसेविका एस. आर. सावंत यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा गौरव केला आणि अशाच प्रकारे यापुढेही निष्ठापूर्वक लोकसेवा द्यावी अशा शुभेच्छा दिल्या.
या बैठकीस माजी उपसरपंच किरण दाभोळकर,
आरोग्यसहाय्यक प्रशांत कांबळे, आरोग्यसेवक सुनील जाधव, ग्रामीण वार्ता पत्रकार सिकंदर फरास, आरोग्यसेविका एस. आर. सावंत, आरोग्य अधिकारी सोनाली पाटील, अंगणवाडी कार्यकर्ती रिया सुकम, मंजिरी कांबळे , महिला प्रतिनिधी जयश्री देवळेकर, सरिता कांबळे ,सेजल कांबळे इत्यादी उपस्थित होते.





