रत्नागिरी : दिवाळीचा सण शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने कंबर कसली आहे. सणाच्या दिवसांत बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी, वाढती नागरिकांची वर्दळ आणि संभाव्य गुन्हेगारी घटनांचा विचार करून जिल्हाभरात विशेष सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच सायबर फसवणुकीला प्रतिबंध आणि अमली पदार्थांच्या गैरव्यवहाराविरोधातील कारवाईवरही पोलीस प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी शहरांसह ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रमुख बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळे आणि पर्यटन परिसरात पोलिसांची उपस्थिती वाढविण्यात आली आहे. नियमित गस्तीबरोबरच अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येत असून, घरफोडी, सोनसाखळी चोरी आणि अन्य मालमत्ताविषयक गुन्हे रोखण्यासाठी विशेष पथकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दिवाळीनिमित्त अनेक नागरिक कुटुंबासह बाहेरगावी जात असल्याने बंद घरांना चोरट्यांकडून लक्ष्य केले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी नागरिकांनी घराच्या सुरक्षिततेची योग्य खबरदारी घ्यावी, परिसरातील संशयास्पद हालचालींकडे दुर्लक्ष करू नये आणि कोणतीही अनुचित बाब निदर्शनास आल्यास तातडीने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सणासुदीच्या काळात वाढणाऱ्या ऑनलाइन व्यवहारांचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस दलाने डिजिटल सुरक्षेबाबतही खबरदारीचा इशारा दिला आहे. ऑनलाइन खरेदीच्या नावाखाली आकर्षक सवलतींचे आमिष, बनावट क्यूआर कोड, केवायसी अद्ययावत करण्याचे संदेश आणि गुंतवणुकीच्या खोट्या योजना अशा माध्यमांतून आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे अनोळखी व्यक्तींना ओटीपी, यूपीआय पिन किंवा बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती देऊ नये. संशयास्पद लिंक उघडणेही टाळावे. सायबर फसवणुकीची घटना घडल्यास विलंब न करता १९३० या राष्ट्रीय हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार दाखल करावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे, तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी आणि जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री व तस्करी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यावर भर देण्यात आला आहे. अमली पदार्थांची साठवणूक, विक्री अथवा वाहतूक करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिले आहेत. त्यामुळे अशा अवैध व्यवहारांवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
दिवाळी हा आनंद, उत्साह आणि एकोप्याचा सण असल्याने नागरिकांनी सुरक्षिततेचे नियम पाळून, पर्यावरणाची काळजी घेत आणि सामाजिक सलोखा जपत उत्सव साजरा करावा. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.




