ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या समाजसेविकेवरच अन्याय झाल्याची भावना; वैदेही सावंत यांचा शाळेबाहेर शांततापूर्ण निषेध!
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या समाजसेविकेवरच अन्याय झाल्याची भावना; वैदेही सावंत यांचा शाळेबाहेर शांततापूर्ण निषेध!
संगमेश्वर

अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या समाजसेविकेवरच अन्याय झाल्याची भावना; वैदेही सावंत यांचा शाळेबाहेर शांततापूर्ण निषेध!

Gramin Varta
Last updated: November 9, 2026 12:08 pm
Gramin Varta
159 Views
Share

पोलीस नोटिशीतील कथित आरोपांमुळे सामाजिक प्रतिष्ठा आणि आत्मसन्मानाला धक्का; २२ वर्षांच्या सामाजिक कार्याचा दाखला देत निष्पक्ष चौकशीची मागणी

देवरुख : गेली २२ वर्षे समाजातील विधवा, निराधार आणि वंचित महिलांच्या सन्मानासाठी निःस्वार्थपणे काम करणाऱ्या समाजसेविका वैदेही प्रभावती सुधीर सावंत यांनाच आज स्वतःच्या सन्मानासाठी न्यायाची मागणी करत रस्त्यावर बसण्याची वेळ आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. संगमेश्वर तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या तक्रारीवरून देवरुख पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीतील कथित आरोपांमुळे आपले चारित्र्यहनन आणि सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचा आरोप करत त्यांनी गुरुवारी पी. एस. बने नॅशनल स्कूल, साडवली येथील प्रवेशद्वाराबाहेर शांततापूर्ण निषेध व्यक्त केला. ‘अन्यायाविरुद्ध लढायला शिकवणारी मी, आज माझ्यावरच अन्याय होत असल्याची भावना घेऊन न्याय मागत आहे,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या.

पी. एस. बने नॅशनल स्कूल, साडवली येथे ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय किशोर-किशोरी गट अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला किंवा तिच्या आयोजनाला आपला कोणताही विरोध नव्हता. मात्र, आपल्याविरोधात करण्यात आलेल्या कथित बदनामीकारक आरोपांमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आपण निषेध केला, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

संगमेश्वर तालुका हौशी कबड्डी असोसिएशनने देवरुख पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या आधारे ४ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून नोटीस बजावली. ही नोटीस देताना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती, असे त्यांचे म्हणणे आहे. स्पर्धेच्या आयोजनात व्यत्यय आणणे, उपस्थित मान्यवरांशी बळजबरीने लगट करणे आणि छायाचित्र काढण्याचा आग्रह धरणे अशा स्वरूपाचे आरोप नोटिशीत नमूद असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः मान्यवरांशी बळजबरीने लगट केल्याच्या उल्लेखामुळे आपल्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची भावना असून, हा प्रकार अत्यंत वेदनादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वैदेही सावंत या गेली २२ वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. विधवा महिलांच्या बाबतीत समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट प्रथांना विरोध करण्यासाठी त्यांनी विधवा महिलांचे हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करून त्यांना सन्मानाने समाजप्रवाहात स्थान मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, दिवाळी फराळाचे वितरण, निराधार महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मोफत टी-स्टॉल गाडी व साहित्य असे सुमारे एक लाख रुपयांचे सहाय्य, शिवीमुक्त समाज अभियान तसेच व्यसनमुक्तीसाठी जनजागृती असे विविध उपक्रम त्यांनी राबविले आहेत. सामाजिक कार्यासोबतच तब्बल १९ वर्षे महिला पोलीस दक्षता समितीमध्ये त्यांनी विनामोबदला योगदान दिले आहे.

या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय असे एकूण १७ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. समाजातील वंचित घटकांसाठी सातत्याने काम करताना अनेक महिलांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे बळ देणाऱ्या व्यक्तीलाच आज स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

कबड्डी क्षेत्राशीही आपले जुने नाते असल्याचे सांगताना सावंत यांनी २०१५ मध्ये कबड्डी पंच परीक्षा उत्तीर्ण केल्याची माहिती दिली. सामनाधिकारी म्हणून संधी मिळावी यासाठी संबंधित असोसिएशनकडे अर्ज केला होता; मात्र त्यावर विचार झाला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. असे असतानाही मुलांना कबड्डी खेळाबाबत मार्गदर्शन करणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि स्पर्धांना उपस्थित राहणे हे आपण सुरूच ठेवले आहे. त्यामुळे आपल्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपांचे स्वरूप आणि त्यामागील भूमिका तपासली जावी, अशी मागणी त्यांनी केली.

‘माझी वर्षानुवर्षांची सामाजिक प्रतिष्ठा एका नोटिशीतील आरोपांमुळे धुळीस मिळणार का? एखाद्या महिलेच्या चारित्र्याशी संबंधित आरोप करताना त्यामागील सत्यता आणि ठोस पुरावे तपासले जाणे आवश्यक आहे. केवळ तक्रारीतील आरोपांच्या आधारे महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू नये. माझी बाजूही योग्य प्रकारे ऐकून घेतली जाणे गरजेचे होते,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.

हातात ‘मला न्याय हवा आहे’, ‘खोट्या आरोपांविरोधात माझा शांततापूर्ण निषेध’, ‘महिला सन्मान, खेळाडू अधिकार आणि न्यायाची मागणी’ अशा आशयाचा फलक घेऊन त्या शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर बसल्या होत्या. यावेळी देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मुरडकर आणि एक महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते. स्पर्धेसाठी ये-जा करणारे खेळाडू, पंच आणि नागरिकांनी थांबून त्यांच्या निषेधामागील कारण जाणून घेतले. त्यांनी कोणताही वाद न घालता आपली भूमिका शांतपणे मांडली. स्पर्धेच्या आयोजनात कोणताही अडथळा न आणता त्यांनी प्रवेशद्वाराबाहेरच निषेध सुरू ठेवला. स्पर्धा संपल्यानंतर पहाटे ३.१५ वाजता त्या घरी परतल्या.

या निषेधादरम्यान काही मुलांनी मिरिंडाची बाटली, चकलीचे पाकीट देत आपुलकी व्यक्त केली, तर काही किशोरवयीन मुलींनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. ‘तुमच्याकडून आम्ही प्रेरणा घेत आहोत. आम्हीही अन्यायाविरुद्ध लढू,’ अशा भावना काही मुलींनी व्यक्त केल्याचे सावंत यांनी सांगितले. आंदोलनाच्या काळात मुलांनी दाखवलेल्या या माणुसकीमुळे डोळ्यांत अश्रू आले; मात्र त्यांच्या आपुलकीने मनाला आधारही मिळाला, असे त्या म्हणाल्या.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून तक्रारीतील आरोपांमागील सत्य समोर आणावे, आपली बाजू योग्य प्रकारे ऐकून घ्यावी आणि दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी वैदेही सावंत यांनी केली आहे. ‘मला कोणाशीही वैयक्तिक संघर्ष करायचा नाही. मात्र, माझ्या सामाजिक प्रतिष्ठेशी आणि आत्मसन्मानाशी तडजोड करणार नाही. ज्या महिलांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले, त्याच अन्यायाविरुद्ध आज मला उभे राहावे लागत आहे. माझे मानसिक खच्चीकरण करून सामाजिक कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना आहे. मला न्याय मिळालाच पाहिजे,’ असे त्यांनी ठामपणे सांगितले.

एका बाजूला २२ वर्षांच्या सामाजिक कार्याचा प्रवास, तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी न्याय मागण्याची वेळ, या विरोधाभासामुळे वैदेही सावंत यांच्या निषेधाची देवरुख परिसरात चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणातील तक्रारीची वस्तुस्थिती, संबंधित असोसिएशनची बाजू आणि पोलिसांची पुढील भूमिका काय राहते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Total Visitors :

5468674
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी अ‍ॅड. मिलिंद उर्फ दादू नांदगावकर; खेडच्या सुपुत्राला प्रदेश कार्यकारिणीत मानाचे स्थान

Gramin Varta
1 Min Read

जि.प.आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडीत ‘नवदुर्गांना वंदन’ उपक्रम संपन्न

Gramin Varta
3 Min Read

विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीत रत्नागिरी जिल्ह्याचा राज्यात डंका; ९८.२१ टक्के कामासह पटकावले दुसरे स्थान

Gramin Varta
2 Min Read

संजय गांधी पेन्शन योजनेसाठी वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य; आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

नायरीतील दिपाली बावदानेची क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी; तालुका क्रीडा स्पर्धेत उंच उडीत सलग तिसऱ्या वर्षी ‘हॅट्रिक’ साधत पटकावला प्रथम क्रमांक

1 Min Read
संगमेश्वर

मानसकोंड ग्रामपंचायतीत लोकसहभागातून श्रमदान; वनराई बंधारा पूर्ण

1 Min Read
संगमेश्वर

बुद्धिबळाच्या पटावर साडवलीच्या आरुष चव्हाणची बाजी; १७ वर्षांखालील विभागीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे करणार प्रतिनिधित्व

2 Min Read
संगमेश्वर

दाभोळे येथे श्री दुर्गाशक्ती मित्र मंडळाच्या वतीने भव्य नवरात्रोत्सवाचे आयोजन; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?