रत्नागिरी: भारत शिक्षण मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित थ्री रांगोळी स्पर्धेत कुडाळच्या केदार टेंबकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी तानपुरा घेऊन आराम करणाऱ्या आजोबांची सुरेख रांगोळी साकारली होती. प्रचंड मेहनत घेऊन आणि सुमारे 24 तासांहून अधिक काळ बसून ही रांगोळी चितारली. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक किशोर पांचाळ (मुंबई, गणपती) आणि तृतीय क्रमांक विकास गायकवाड (वारणा, कोल्हापूर, मासे विकणारी महिला) यांनी मिळवल्याची माहिती संस्थेच कार्यवाह धनेश रायकर यांनी दिली.
या चुरशीच्या स्पर्धेत सुमारे २५ रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या. स्पर्धकांना रांगोळी साकारण्यासाठी एक दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात थ्री डी रांगोळी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला राज्यातील विविध भागांतून स्पर्धक सहभागी झाले हे विशेष.
स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक अभिषेक सुतार (भांडुप, मुंबई), विजय मेस्त्री (कुडाळ), आणि ओम मोरे (छत्रपती संभाजीनगर), निवृत्ती धुळे (अमरावती), प्रशांत आर्वी (नाशिक) यांनी मिळवला. हे प्रदर्शन आजपासून १२ नोव्हेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. थ्री डी रांगोळीच्या माध्यमातून कलात्मकतेचा अनोखा आविष्कार पाहायला मिळणार आहे. प्रदर्शनात गणपती, बाळकृष्ण, मासे विकणारी महिला, खेकडा, फुटबॉलपटू, पुस्तक वाचणारी मुलगी, मराठमोळी महिला, किटलीतून कपात चहा ओतताना, लहान बालक अशा विविध प्रकारच्या रांगोळ्या साकारण्यात आल्या आहेत. परीक्षक म्हणून प्रभावती पिलणकर, विक्रांत मेस्त्री, सागर पुसाळकर यांनी काम पाहिले. प्रथम विजेत्याला १२ हजार रुपये, द्वितीय १० हजार व तृतीय क्रमांकाला ८ हजार रुपये बक्षीस देण्यात आले. उत्तेजनार्थ ५ बक्षिसे प्रत्येकी ३ हजार रुपये देण्यात आली.
यासंबंधी कार्यवाह श्री धनेश रायकर यांनी सांगितले की, यंदा प्रथमच पटवर्धन हायस्कूलमध्ये राज्यस्तरीय रंगयात्रा २०२६ – कलेचा आविष्कार, खरेदीचा बहार या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध प्रकारचे आकर्षक स्टॉल्स हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. ज्वेलरी, कपडे, गृहसजावटीच्या वस्तू, खाद्यपदार्थ तसेच विविध आकर्षक उत्पादनांची खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. खरेदीच्या महोत्सवासोबतच थ्री डी रांगोळी प्रदर्शन आणि विशेष शोभिवंत मत्स्य प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त नृत्य, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवता येणार आहे. खरेदी, कला, खाद्यसंस्कृती आणि मनोरंजन यांचा संगम असलेल्या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन अध्यक्ष सौ नमिता कीर आणि कार्याध्यक्ष श्री श्रीराम भावे यांच्याकडून करण्यात आले आहे.






