मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केलेल्या गंभीर आणि वादग्रस्त विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. रामदास कदम यांनी केलेले सर्व आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आणि खोटे असल्याचे सांगत, या प्रकरणी त्यांना लवकरच कायदेशीर नोटीस बजावण्यात येणार असल्याचा इशारा तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
कदम यांनी केलेल्या आरोपांमागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना सुनील तटकरे यांनी त्यांच्या मानसिक स्थितीवर खोचक शब्दांत ताशेरे ओढले. अलिकडच्या काळातील वक्तव्ये पाहता कदम यांची मानसिक स्थिती ढासळली असून ठाण्यापेक्षा आग्र्यामध्ये अधिक चांगल्या दर्जाचे मानसोपचार तज्ज्ञ उपलब्ध आहेत, त्यामुळे त्यांच्यावर आग्र्याला नेऊन उपचार सुरू करण्याची आवश्यकता आहे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. माजी मुख्यमंत्री दिवंगत ए. आर. अंतुले यांच्या नावावरून केलेल्या वक्तव्यांचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. अंतुले यांनी आपल्याला पुत्रवत प्रेम देऊन कार्यकर्ता म्हणून घडवले, आपण कधीही त्यांचे स्वीय सहाय्यक (पीए) नव्हतो, असे स्पष्ट करत स्वतः अंतुलेंविरोधात सातत्याने गरळ ओकणाऱ्या कदम यांना त्यांच्या नेतृत्वावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही, असे तटकरे यांनी ठणकावून सांगितले. इतरांवर आरोप करण्याऐवजी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केलेल्या आरोपांवर आधी स्वतःची प्रतिमा तपासून खुलासा करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
आपल्या राजकीय वाटचालीचा उल्लेख करताना तटकरे यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत सर्वांनाच आपली राजकीय पार्श्वभूमी चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार आणि खालच्या पातळीवरील वक्तव्यांची दखल वरिष्ठ स्तरावर गांभीर्याने घेतली जाईल. दरम्यान, राजकीय इतिहासाची आठवण करून देत तटकरे यांनी रामदास कदम यांना थेट आव्हान दिले. भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतरच्या कालावधीत गोपीनाथ मुंडे यांचे पत्र आले असता, स्वतः रामदास कदम हे ‘मेघदूत’ बंगल्यावर येऊन विनवणी करत होते. त्यावेळी आपण स्वतः त्यांना गाडीत बसवून अजित पवार यांच्याकडे नेले आणि त्यानंतरच ते विरोधी पक्षनेते झाले, हा इतिहास आठवून कदम ज्या परिसरातील जागृत देवस्थान मानतात, तिथे जाऊन त्यांनी सुनील तटकरे खोटे बोलत आहेत हे सांगून दाखवावे, असे जाहीर आव्हान तटकरे यांनी दिले.





