सुपरफास्ट दर्जा तातडीने रद्द करण्याची कोकण विकास समितीची मागणी
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसच्या नियमित धावण्यावर मोठा परिणाम झाला असून, ही गाडी सातत्याने विलंबाने धावत असल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. कोकणकन्या एक्सप्रेसला दिलेला ‘सुपरफास्ट’ दर्जा या विलंबाच्या दुष्टचक्रास कारणीभूत ठरत असल्याचा दावा करत, कोकण विकास समितीने कोकणकन्या एक्सप्रेसचा सुपरफास्ट दर्जा त्वरित रद्द करण्याची ठाम मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांचे रॅक (डबे) एकमेकांशी जोडलेले असल्याने एका गाडीच्या विलंबाचा थेट परिणाम दुसऱ्या गाडीवर होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (CSMT) सुटणारी गाडी क्रमांक २०१११ कोकणकन्या सुपरफास्ट एक्सप्रेस अनेकदा नियोजित वेळेपेक्षा उशिराने म्हणजे सकाळी ११:३० ते दुपारी १२:०० वाजल्यानंतर मडगाव येथे पोहोचते. नियमानुसार गाडीच्या रॅकची प्राथमिक देखभाल, स्वच्छता आणि तांत्रिक तपासणीसाठी आवश्यक असलेला अवधी न मिळाल्यामुळे तिथून मुंबईकडे निघणाऱ्या मांडवी एक्सप्रेसच्या प्रस्थानाला दररोज उशीर होत आहे. परिणामी, मडगावहून मुंबईकडे येताना आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईहून गोव्याकडे निघताना मांडवी एक्सप्रेसचे संपूर्ण वेळापत्रक पूर्णपणे कोलमडत असून, दिवसभरातील प्रवाशांना तासनतास खोळंबून राहावे लागत आहे.
सुपरफास्टचा दर्जा देऊनही प्रत्यक्षात कोकणकन्या एक्सप्रेसचा प्रवासाचा वेळ कमी झालेला नाही, उलट प्रवाशांवर जादा अधिभाराचा भुर्दंड पडत आहे आणि त्याचवेळी मांडवी एक्सप्रेसचे संचलनही विस्कळीत होत आहे, याकडे कोकण विकास समितीने लक्ष वेधले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन कोकणकन्या एक्सप्रेसचा सुपरफास्ट दर्जा तात्काळ मागे घ्यावा, ही गाडी मडगाव येथून पूर्वीप्रमाणे सायंकाळी ६:०० वाजता सोडण्यात यावी तसेच मांडवी एक्सप्रेसच्या वेळेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही अशी परिचालन व्यवस्था नव्याने करावी, अशी मागणी कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत दरेकर आणि अक्षय महापदी यांनी रेल्वे प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.






