दापोली : जन्माला येऊन अवघे ४१ दिवस झालेले असताना चिमुकल्या रिशा नरेश पावसे हिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. श्वास घेण्यासह अन्य शारीरिक त्रासामुळे विविध रुग्णालयांत उपचारासाठी धावपळ सुरू असतानाच १ नोव्हेंबर रोजी रात्री डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. या हृदयद्रावक घटनेने दापोली तालुक्यातील पाजपंढरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रिशा नरेश पावसे (वय ४१ दिवस, रा. पाजपंढरी, ता. दापोली) असे मृत बालिकेचे नाव आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिशाला लघवी करण्यास तसेच श्वास घेण्यास तीव्र त्रास जाणवू लागल्याने नातेवाईकांनी तिला तातडीने दापोली येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिची प्रकृती अधिकच खालावल्याने पुढील उपचारांसाठी महाड येथील अथर्व चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे आवश्यक अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने आणि बालिकेची श्वसनविषयक स्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला तातडीने डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार नातेवाईकांनी रुग्णवाहिकेतून तिला चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असतानाच १ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ७ वाजून ५१ मिनिटांनी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेची अधिकृत नोंद ९ नोव्हेंबर २०२६ रोजी दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस पुढील तपास करीत आहेत.
अवघ्या ४१ दिवसांच्या आयुष्यातच चिमुकल्या रिशाचा प्रवास थांबल्याने पावसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.





