रत्नागिरी : कोकणातील निसर्गसंपन्न रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वायू प्रदूषणात मोठी वाढ झाल्याचे समोर आले असून, परिणामी हवेच्या गुणवत्तेतही घसरण नोंदवली गेली. ८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री ठीक ३ वाजून ३० मिनिटांनी हवेतील अतिसूक्ष्म प्रदूषणकारी कणांचे म्हणजेच पीएम २.५ चे प्रमाण कमालीचे वाढल्यामुळे एरवी ७० ते ७६ च्या आसपास राहणारा हवेचा निर्देशांक (एक्यूआय) थेट ३४७ या गंभीर पातळीवर पोहोचला होता. मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे हवेत विषारी धूर साचून राहिल्याने काही तासांसाठी संपूर्ण परिसरातील हवा प्रदूषित झाली होती; मात्र समुद्राकडून येणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे हा धूर लवकरच विरळ झाला आणि हवा मोकळी झाल्यानंतर सकाळपर्यंत हवेची गुणवत्ता पुन्हा स्वच्छ होऊन ८९ एक्यूआयवर स्थिरावल्याने रत्नागिरीकरांना मोठा दिलासा मिळाला.






