पालशेत/उदय दणदणे : गणेशोत्सवाच्या तोंडावर पालशेत-निवोशी ग्रामपंचायत हद्दीतील जोईलवाडी येथे निर्माण झालेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. गेल्या आठ दिवसांपासून खंडित असलेला नळपाणीपुरवठा पूर्ववत झाल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, ऐन सणासुदीच्या काळात पाण्याची समस्या दूर झाल्याने समाधानाचे वातावरण आहे.
जोईलवाडीतील पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत लाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला होता. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची गरज वाढलेली असताना ही समस्या निर्माण झाल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. याबाबत ‘ग्रामीण वार्ता’ने १६ सप्टेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
वृत्त प्रसिद्ध होताच ग्रामपंचायत प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेत बिघाड दूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू केली. तांत्रिक अडचणीवर मात करत अखेर विद्युत लाईनमधील बिघाड दुरुस्त करण्यात आला आणि नळाद्वारे पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.
पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांसोबतच जोईलवाडी ग्रामस्थ मंडळाने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यालाही यश आले आहे. पाणी पुन्हा उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, तातडीने समस्या सोडविल्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले आहेत.
दरम्यान, स्थानिक समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देताच त्यावर तातडीने कार्यवाही झाल्याने ‘ग्रामीण वार्ता’च्या वृत्ताची प्रशासनाने घेतलेली दखल चर्चेचा विषय ठरली आहे. गणेशोत्सवाच्या काळात पाणीपुरवठा पूर्ववत झाल्याने जोईलवाडीतील ग्रामस्थांचा सणाचा आनंद आता अधिकच वाढला आहे.
‘ग्रामीण वार्ता’च्या बातमीची प्रशासनाकडून दखल; पालशेत-जोईलवाडीत अखेर पाणीपुरवठा पूर्ववत
Leave a Comment





