हरहुन्नरी कलाकाराचा उपक्रम; देखाव्यातून परमार्थ व समाजप्रबोधनाचा संदेश
लांजा/अरबाज नेवरेकर: गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि उत्साहासोबतच आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी. याच भावनेतून वनगुळे-सुतारवाडी येथील हरहुन्नरी कलाकार पंकज रमेश पांचाळ व परिवाराने यंदाच्या गणेशोत्सवासाठी ‘श्री समर्थ बैठक’ या संकल्पनेवर आधारित आकर्षक व समाजप्रबोधनपर देखावा साकारला आहे.
दरवर्षी आपल्या घरी श्री गणेशाचे आगमन झाल्यानंतर काहीतरी वेगळे, पर्यावरणपूरक आणि समाजाला सकारात्मक संदेश देणारे सादर करण्याचा पांचाळ परिवाराचा प्रयत्न असतो. यंदा त्यांनी श्री धर्माधिकारी कुटुंबीयांच्या परमार्थाच्या कार्यातील ‘श्री समर्थ बैठक’ या संकल्पनेची छोटीशी प्रतिकृती देखाव्याच्या माध्यमातून साकारली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून श्री धर्माधिकारी कुटुंबीय समाजामध्ये परमार्थाचे विचार रुजविण्याचे कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याची ओळख आणि त्यामागील सामाजिक विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने ‘श्री समर्थ बैठक’चा देखावा उभारण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिकतेसोबत सामाजिक आणि सकारात्मक विचारांचा प्रसार करण्याचा हा प्रयत्न आहे.जेजुरी, गणेश कार्यशाळा, चाळ , अशे अनेक देखावे त्याने साकारले होते.
मूर्तिकार आनंद मेस्त्री यांनी साकारलेल्या गणेशमुर्तीतून देखाव्याला अजून रंगत आली. तसेच संजय मेस्त्री, किशोर मेस्त्री, सोहम पांचाळ, राजेश मेस्त्री आणि तेजस मासये यांनी देखावा साकारण्यासाठी विशेष सहकार्य केले.
पंकज पांचाळ यांच्या कल्पकतेतून साकारलेला हा देखावा केवळ सजावटीपुरता मर्यादित न राहता गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाला विचार देणारा उपक्रम ठरला आहे. भक्ती, कला आणि समाजप्रबोधन यांचा सुंदर संगम साधणाऱ्या या देखाव्याचे परिसरात कौतुक होत आहे.
गणेशोत्सवात साकारली ‘श्री समर्थ बैठक’; वनगुळे-सुतारवाडीतील पंकज पांचाळ यांच्या कलाकृतीने वेधले लक्ष
Leave a Comment





