मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ या धोरणांतर्गत मुंबईतील अन्न आस्थापनांवर धडक तपासणी मोहीम राबवत अस्वच्छतेविरोधात कठोर पाऊल उचलले आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली २७ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत काळबादेवी येथील शंभर वर्षांहून जुन्या मे. क्यानी अँड कंपनी (Kyani & Co.) या ऐतिहासिक बेकरी आस्थापनामध्ये अस्वच्छतेचे अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. अन्न तयार करणे आणि साठवणुकीच्या जागी मांजर, जिवंत माश्या, मृत झुरळे व उंदरांची विष्ठा आढळली असून रेफ्रिजरेटरमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्त साचल्याचे समोर आले. शिवाय प्रक्रिया विभागात उघडे सांडपाणी मॅनहोल, जमिनीवर ठेवलेले अन्नपदार्थ, वर्तमानपत्राने झाकलेले कच्चे पीठ आणि कामगारांकडून वैयक्तिक स्वच्छता व पीपीई साधनांचा अभाव या गंभीर त्रुटींमुळे ग्राहकांच्या आरोग्यास थेट धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम ३२(३) नुसार क्यानी अँड कंपनीचा एफएसएसएआय परवाना (क्र. ११५१७००१०००३१८) तात्काळ निलंबित करून अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, खरेदी, विक्री आणि वितरण पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने बजावले असून त्यावर कडक देखरेख ठेवली जात आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान शहरातील एकूण १३ विविध प्रमुख आस्थापनांवर प्रशासनाचा बडगा उगारण्यात आला आहे. लोअर परेल येथील प्रसिद्ध ‘सबवे’ (Subway) उपाहारगृहात फ्रीजमध्ये बुरशीसदृश थर, दुर्गंधी, जिवंत झुरळे, पाणी साचलेली घाण आणि शाकाहारी-मांसाहारी पदार्थांची अयोग्य साठवणूक आढळल्याने त्यांचाही परवाना निलंबित करण्यात आला. कुलाब्यातील नामांकित ‘कुलाबा स्वीट मार्ट’मध्ये वजनकाटे व पॅकेजिंग साहित्यावर जिवंत झुरळे, पाल, अळ्या आणि माश्यांचा प्रादुर्भाव तसेच अन्नपदार्थांजवळ मॉपच्या अस्वच्छ बादल्या आढळून आल्याने निलंबनाची कारवाई झाली. धारावीतील ‘अरुण विलास फरसाण’मध्ये उंदरांनी कुरतडलेले अन्नपदार्थ, पेस्ट कंट्रोलचा अभाव आणि अस्ताव्यस्त साठवणूक आढळल्याने, तर विलेपार्ले येथील ‘डॅफोडिल्स फास्ट फूड इन’मध्ये कामगार साठवणूक कक्षात झोपत असल्याचे तसेच थेट बाथरूमच्या जागेत नारळ सोलण्याचे काम सुरू असल्याचे अत्यंत किळसवाणे वास्तव समोर आल्याने त्यांचे परवाने निलंबित झाले.
याशिवाय परळ येथील ‘रुची व्हेज रेस्टॉरंट’चा परवाना निलंबित करून जागा खाली करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, चेंबूरमधील ‘एस. एस. केटरर्स’कडे कोणताही वैध परवाना नसल्याने त्यांचा व्यवसाय तत्काळ बंद पाडण्यात आला आहे. विनापरवाना व्यवसाय चालवल्यास सहा महिन्यांपर्यंत कारावास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंड, तर आदेशांचे उल्लंघन केल्यास दोन लाखांपर्यंतच्या दंडाची कायदेशीर तरतूद असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. एफएसएसएआय शेड्युल-४ मधील स्वच्छता व आरोग्यविषयक मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी क्युएसआर ब्रँड्स इंडिया, फोर्टमधील मे. अस्त्रा कॉर्पोरेशन (रॉयल चायना), वांद्रे पश्चिमेतील मे. टिफिन, सांताक्रूझमधील मे. युनायटेड बेकरी अँड स्टोअर्स, जोगेश्वरीतील मे. श्री पद्मावती एंटरप्रायझेस आणि खार येथील हॉटेल पुरंदर विलास या नामांकित संस्थांविरोधातही कायद्यानुसार थेट खटले दाखल करण्यात आले आहेत.






