राजापूर (तुषार पाचलकर):- राजापूर तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा २०२६-२७ मध्ये सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचलच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत देदीप्यमान यश संपादन केले आहे. १७ वर्षे वयोगटातील चुरशीच्या स्पर्धांमध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या क्रीडाकौशल्याचा ठसा उमटवत यशोशिखरे सर केली. या स्पर्धेत धावपटू कु. वेदांत सुशील चव्हाण याने २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत उत्कृष्ट वेग आणि कौशल्याचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला असून, त्याची रत्नागिरी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड झाली आहे. याच वयोगटातील मुलींच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कु. सानवी संतोष गुरव हिने अत्यंत चुरशीच्या लढतीत तृतीय क्रमांक मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या दोन्ही यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. नितीन सांडम सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या देदीप्यमान यशाबद्दल पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. राजेश सावंत, कार्याध्यक्ष मा. श्री. अशोक सक्रे, सचिव मा. श्री. रामचंद्र वरेकर, सहसचिव मा. श्री. किशोर नारकर, खजिनदार मा. श्री. राजन लब्दे यांच्यासह सर्व सन्माननीय संचालक मंडळ, मुख्याध्यापिका श्रीम. आशा गुरखे, पर्यवेक्षिका श्रीम. प्रमिला गांधी तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेत्या खेळाडूंचे भरभरून कौतुक केले असून, वेदांत चव्हाण याला आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेतील यशस्वी घोडदौडीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.






