निलेश कोकमकर/ठाणे : कोकणातील कुणबी समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय प्रगती साधण्यासाठी समाजातील विविध क्षेत्रांतील नेतृत्वाने एकत्र येत संघटितपणे काम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे येथे कुणबी समाजाच्या नेतृत्वाची पहिली बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. समाजातील विविध घटकांमध्ये समन्वय वाढविणे, परस्पर संवाद अधिक दृढ करणे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली.
कोकणात कुणबी समाजाची मोठी लोकसंख्या असूनही समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी व्यापक संघटन आणि समन्वित नेतृत्वाची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. समाजातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मान्यवरांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. समाजाच्या सामूहिक हिताला प्राधान्य देत भविष्यातील वाटचाल निश्चित करण्याच्या दृष्टीने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले.
समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीबरोबरच आर्थिक सक्षमीकरण, राजकीय सहभाग आणि नव्या पिढीला प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या विषयांवर एकत्रित प्रयत्नांची गरज या निमित्ताने अधोरेखित झाली. समाजातील विविध संस्थांनी स्वतंत्रपणे केलेल्या कामाला परस्पर सहकार्याची जोड मिळाल्यास अनेक प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करता येऊ शकते. त्यासाठी नेतृत्वामध्ये नियमित संवाद, परस्पर समन्वय आणि समाजहिताच्या विषयांवर एकत्रित भूमिका विकसित होणे आवश्यक असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले.
या बैठकीला कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे संघाध्यक्ष अनिल नवगणे आणि जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्यासह कोकणातील कुणबी समाजाचे विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले मान्यवर उपस्थित होते. यामध्ये संघाचे सरचिटणीस कृष्णा वणे, उपाध्यक्ष उदय कठे व शंकरराव म्हसकर, सहचिटणीस रवींद्र कुरतडकर, संजय उमासरे व प्रमोद खेराडे, खजिनदार महेश शिर्के, ज्येष्ठ संघ कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत बावकर, रमेश कानावले, सुरेश कानाल, चंद्रकांत कोकमकर, अनिल भोवड, मिलिंद महाडिक व विजय नायनाक यांचा समावेश होता.
तसेच जिजाऊ संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर, कुणबी सेवा संघ महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष रवींद्र मटकर, मंगेश हुमणे, ॲड. सुभाष बाणे, कुणबी बँकेचे संचालक संतोष चौगुले व नरेश घरटकर, कुणबी युवा मुंबईचे सरचिटणीस सचिन रामाणे, उपाध्यक्ष पुनीत खांडेकर, खजिनदार पांडुरंग दोडेकर आणि प्रचारक सूर्यकांत गावणकर उपस्थित होते.
ठाण्यात झालेल्या या बैठकीमुळे कोकणातील कुणबी समाजाच्या विविध संस्थांमधील नेतृत्वाला संवादासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या संवादाचे रूपांतर भविष्यात ठोस सामाजिक उपक्रमांमध्ये होणे, समाजातील शैक्षणिक व आर्थिक प्रश्नांच्या निराकरणासाठी सामूहिक प्रयत्न उभे राहणे आणि नव्या पिढीला प्रगतीच्या अधिकाधिक संधी मिळणे, या अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहेत. समाजाची सामाजिक व सांस्कृतिक ओळख जपत बदलत्या काळानुसार विकासाची दिशा स्वीकारण्यासाठी संघटनात्मक एकजूट कितपत प्रभावी ठरते, हे आगामी काळात स्पष्ट होईल.






