सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी, सावर्डे आणि कॉलेज ऑफ नर्सिंग, सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने सीपीआर (CPR) व प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी त्वरित आणि योग्य मदत कशी करावी, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या प्रशिक्षणादरम्यान हृदय-फुफ्फुस पुनरुज्जीवन (सी. पी. आर.), प्राथमिक उपचारांचे महत्त्व, अपघाताच्या वेळी घ्यावयाची काळजी तसेच वैद्यकीय मदत मिळेपर्यंत करावयाच्या आवश्यक उपाययोजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
आजच्या धावपळीच्या जीवनात अपघात, अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय समस्या आणि इतर आपत्कालीन प्रसंगांमध्ये प्रथमोपचाराचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य वेळी दिलेली मदत एखाद्याचा जीव वाचविण्यास उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञान न घेता सामाजिक बांधिलकी जपत आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता, आपत्कालीन प्रतिसादाची जाणीव आणि समाजसेवेची भावना वृद्धिंगत होण्यास मदत झाली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच समाजहिताच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला.





