संगमेश्वर / योगेश चव्हाण: उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी वाशी तर्फे संगमेश्वर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी एकत्र येत शुक्रवारी एकाच दिवशी गावात तब्बल १५ विजय बंधारे यशस्वीरीत्या पूर्ण केले. लोकसहभाग आणि श्रमदानातून उभ्या राहिलेल्या या उपक्रमामुळे वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होणार असून, गावात एकूण २० विजय बंधारे उभारण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.
वाशी तर्फे संगमेश्वर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित या जलसंधारण मोहिमेत सरपंच तन्वी गानू, उपसरपंच रमण जाधव, ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला महाडिक, पूर्वा मेस्त्री यांच्यासह सर्व सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी नियती चव्हाण, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष उदय महाडिक आणि गावातील विविध वाड्यांमधील ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी एकजुटीने श्रमदान करत गावातील विविध जलस्रोतांवर एकाच दिवसात १५ बंधारे बांधून पूर्ण केले, तर उर्वरित ५ बंधारेही लवकरच पूर्ण केले जाणार आहेत. ग्रामपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत जलसंधारणाच्या कार्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याबद्दल सरपंच तन्वी गानू यांनी सर्व ग्रामस्थ व महिलांचे मनापासून आभार मानले असून, वाशी ग्रामस्थांच्या या सामूहिक प्रयत्नांचे तालुक्यातून कौतुक होत आहे.





