रत्नागिरी: कोकण रेल्वे महामंडळाने (केआरसीएल) आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल १९९.६३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. गेल्या अडीच वर्षांत महामंडळाला २०,०५९ कोटी रुपयांची नवीन कामे मिळाली असून, सध्या २३,५५२ कोटी रुपयांची विविध विकासकामे वेगाने सुरू आहेत.
महामंडळाचा ३७ वा स्थापना दिन गुरुवारी वाशी येथील सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी आर्थिक कामगिरी, मालवाहतूक आणि प्रवासी सेवांचा सविस्तर आढावा घेतला. याप्रसंगी संचालक सुनील गुप्ता, राजीव कुमार मिश्रा, मुख्य दक्षता अधिकारी अविनाश तारहवाडकर आणि महिला सांस्कृतिक व सामाजिक सेवा संघटनेच्या अध्यक्षा मनीषा झा उपस्थित होत्या. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व सुरक्षित करण्यासाठी केआरसीएलने मोठी तरतूद केली आहे.
२०२६-२७ या आर्थिक वर्षात प्रवासी सुविधांसाठी २०.७७ कोटींची तरतूद करण्यात आली असून, पुढील पाच वर्षांत तब्बल १०५ कोटी रुपये खर्च करण्याचे ठोस नियोजन आहे. महामंडळाने पादचारी पुलांचे संरचनात्मक परीक्षण करून २१ पुलांची यशस्वी दुरुस्ती पूर्ण केली आहे. याशिवाय, गर्दीच्या हंगामात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान २४५ उन्हाळी विशेष, ३७९ गणपती विशेष आणि पाच विशेष गाड्या चालवण्यात आल्या. महामंडळाने तिकीट तपासणीतून १५.०४ कोटींचे उत्पन्न मिळवले असून, विनातिकीट प्रवाशांविरोधातील मोहिमांमधून ६.२३ कोटींची वसुली केली आहे.
विशेष म्हणजे, कोकण रेल्वे आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही ठसा उमटवत असून, काँगो प्रजासत्ताकात मेट्रो बांधकाम सुरू करण्याची तयारी सुरू आहे, तर श्रीलंकेतील पूल बांधकाम प्रकल्पांच्या निविदेतही महामंडळ सहभागी झाले आहे.





