मालगुंड (वैभव पवार): जिल्हा परिषद रत्नागिरी आयोजित नासा-इस्रो परीक्षा २०२५-२६ मध्ये दैदिप्यमान यश संपादन करत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून नासा व इस्रो या दोन्ही अभ्यास दौऱ्यांसाठी पात्र ठरलेली मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयाची कन्या कु. आर्या मोहन शिगवण हिचा बहुप्रतिक्षित अमेरिका दौरा येत्या १२ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. मे महिन्यात तिने इस्रो (बेंगलोर) अभ्यास दौरा यशस्वीरीत्या पूर्ण केला असून आता १२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत ती अमेरिकेतील नामांकित अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ (NASA) येथे अभ्यासासाठी रवाना होणार आहे.
रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी शिगवणवाडी येथील एका सामान्य कुटुंबातील रहिवासी असलेल्या आर्याने इयत्ता आठवीत शिकत असतानाच ही जागतिक पातळीवर दखल घेण्याजोगी उत्तुंग झेप घेतली आहे. बालपणापासूनच अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता आणि गुणवत्तेच्या जोरावर तिने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये स्वतःचा ठसा उमटवला आहे. तिने इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतही गुणवत्ता यादीत विशेष क्रमांक पटकावला होता. केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही ती तितकीच अग्रेसर असून कबड्डी, खो-खो यांसारख्या मैदानी खेळांमध्ये तिने विशेष प्राविण्य मिळवले आहे.
यापूर्वी मे महिन्यात तिची इस्रो दौऱ्यासाठी निवड झाल्यानंतर वरची निवेंडी गावातील ग्रामस्थांनी तिची भव्य मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला होता, तसेच निवेंडी ग्रामपंचायतीकडून तिचा विशेष नागरी सत्कारही करण्यात आला होता. आता संपूर्ण जिल्ह्यातून एकमेव विद्यार्थिनी म्हणून थेट अमेरिकेतील नासा अभ्यास दौऱ्याची संधी मिळाल्याने वरची निवेंडी, मालगुंड आणि गणपतीपुळे परिसरात तिच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आपल्या यशामागे आई-वडिलांचे भक्कम पाठबळ, बळीराम परकर विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि ग्रामस्थांचे निरंतर प्रोत्साहन लाभल्याचे आर्याने कृतज्ञतापूर्वक नमूद केले आहे. ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य घरातील विद्यार्थिनीने स्वतःच्या गुणवत्तेच्या जोरावर घेतलेली ही आंतरराष्ट्रीय अंतराळ झेप संपूर्ण कोकणासाठी अत्यंत भूषणावह आणि इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.






