रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या अत्यंत वर्दळीच्या आणि मध्यवर्ती भागात असलेल्या मुख्य पोस्ट ऑफिससमोरील वाहनतळाच्या प्रवेशद्वारावर पडलेल्या एका मोठ्या धोकादायक खड्ड्यामुळे वाहनधारकांना दररोज प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. नगर परिषद प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा खड्डा दिवसेंदिवस अधिक खोल आणि जीवघेणा बनला असून, वाहनतळात प्रवेश करताना महिंद्रा थारसारखी दणकट चारचाकी गाडी या खड्ड्यात अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गाडीचे चाक खड्ड्यात खोलवर रुतल्याने ते बाहेर काढताना वाहनचालकासह तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांची चांगलीच दमछाक झाली. या घटनेमुळे या खड्ड्याची तीव्रता आणि त्यातून उद्भवणारा संभाव्य मोठा धोका पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुख्य पोस्ट ऑफिस परिसरात दैनंदिन विविध शासकीय व खासगी कामांसाठी नागरिकांची मोठी ये-जा असते आणि त्यामुळे या वाहनतळाचा वापर सतत सुरू असतो. अनेक दिवसांपासून हा खड्डा असाच उघडा अवस्थेत पडून असूनही पालिका प्रशासनाकडून साधी डागडुजीही करण्यात आलेली नाही. दिवसा हा खड्डा वाहनचालकांच्या नजरेस पडत असला, तरी रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशामुळे तो सहज दिसत नसल्याने दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडून गंभीर अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वाहनतळात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना चालकांना मोठी कसरत व कमालीची सावधगिरी बाळगावी लागत असून वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे.
नागरिक नियमित कर भरत असतानाही त्यांना अशा प्रकारे सुरक्षित रस्ते व मूलभूत सोयीसुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याने स्थानिक रहिवासी व वाहनधारकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या ठिकाणी एखादी मोठी दुर्घटना अथवा जीवितहानी घडण्याची वाट न पाहता, नगर परिषदेच्या संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन हा खड्डा बुजवावा आणि वाहनतळाचा प्रवेशमार्ग सुरक्षित करावा, अशी आक्रमक मागणी आता शहरवासीयांमधून केली जात आहे.





