दापोली: ‘मुंबईला जाण्यासाठी गाडीचे तिकीट काढायला दापोलीला जातो’ असे कुटुंबीयांना सांगून घरातून पडलेल्या एका ४६ वर्षीय व्यक्तीचा जंगलातील झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना साखळोली येथे उघडकीस आली आहे. रामचंद्र लक्ष्मण गौरत (वय ४६, रा. साखळोली नवजीवन वाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे मयत व्यक्तीचे नाव असून, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र गौरत हे दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मुंबईला जाण्याचे तिकीट काढण्यासाठी दापोली येथे जातो असे सांगून घरातून निघाले होते. मात्र, सायंकाळ उलटून गेली तरी ते परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास साखळोली पाचआंबा येथील जंगलात एका ऐनाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत रामचंद्र गौरत यांचा मृतदेह लटकताना मिळून आला.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ खाली उतरवून उपचारासाठी ॲम्बुलन्सने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दुपारी एक वाजता त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालय दापोली यांच्या माहितीवरून दापोली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू (अ.मृ. क्रमांक ८५/२०२६) अन्वये बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.






