लांजा (अरबाज नेवरेकर) : लांजा शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, शहरातून संकलित करण्यात येणारा कचरा केळंबे घाट परिसरात टाकून त्याला आग लावली जात असल्याच्या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कचरा जाळल्यामुळे परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण होत असून, दुर्गंधी आणि वायुप्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत असून, नगरपंचायतीच्या कचरा व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवरच आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
लांजा नगरपंचायतीची स्थापना होऊन अनेक वर्षांचा कालावधी लोटला आहे. या काळात तीन पंचवार्षिक निवडणुकाही पार पडल्या; मात्र शहरातील कचऱ्याची कायमस्वरूपी आणि पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्याची सक्षम यंत्रणा अद्याप कार्यान्वित झालेली नसल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील घराघरांतून तसेच विविध ठिकाणांहून जमा होणारा ओला-सुका कचरा आणि अन्य टाकाऊ वस्तू केळंबे परिसरात आणून टाकल्या जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यातच कचऱ्याला आग लावली जात असल्याने धुराचा त्रास अधिकच वाढत आहे. विशेषतः प्लास्टिकसह इतर ज्वलनशील वस्तू जाळल्याने निर्माण होणाऱ्या धुराचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने स्थानिक नागरिक चिंतेत आहेत.
या समस्येबाबत यापूर्वी विवली-केळंबे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतही आवाज उठविण्यात आला होता. शिवसेना ठाकरे गटाचे अभिजित राजेशिर्के यांनी नगरपंचायतीच्या या कार्यपद्धतीला विरोध दर्शवत केळंबे परिसरात कचरा टाकण्यास हरकत घेतली होती. यासंदर्भात नगरपंचायत प्रशासनाला लेखी स्वरूपात कळवून परिसरात कचरा टाकू नये, अशी मागणीही करण्यात आली होती. मात्र, या सूचनेनंतरही कचरा टाकण्याचा प्रकार सुरूच असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
एकीकडे स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले जात असताना दुसरीकडे शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अशा प्रकारांचा अवलंब होत असल्यास ही बाब गंभीर आहे. कचरा उघड्यावर टाकणे आणि तो जाळणे यामुळे पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे केळंबे परिसरात सुरू असलेला हा प्रकार तातडीने बंद करून कचऱ्याच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी पर्यायी व्यवस्था उभारावी, तसेच या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
नगरपंचायत प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे केळंबे परिसरातील प्रदूषणाच्या प्रश्नावर नगरपंचायत प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, याकडे आता स्थानिकांचे लक्ष लागले आहे.







