नंदुरबार : घरातील मोठी माणसे कामानिमित्त बाहेर असताना शेताच्या बांधावर खेळणाऱ्या आठ चिमुकल्यांनी एरंडीच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झाल्याची हृदयद्रावक घटना धडगाव तालुक्यातील मोडलगाव येथे घडली. या घटनेत चार वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अन्य सात बालकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोडलगाव येथील काही कुटुंबे उदरनिर्वाहासाठी रोजगाराच्या शोधात परजिल्ह्यांत स्थलांतरित झाली आहेत. त्यामुळे या कुटुंबांतील लहान मुलांची जबाबदारी गावात राहणाऱ्या वृद्ध नातेवाईकांकडे होती. घटनेच्या दिवशीही मुलांचे पालक रोजगारानिमित्त बाहेर गेले होते. घरातील वृद्ध नातेवाईक नेहमीप्रमाणे गुरांना चरण्यासाठी घेऊन बाहेर पडले होते. याच काळात घराजवळील परिसरात आणि शेताच्या बांधावर खेळत असलेल्या बालकांचे लक्ष एरंडीच्या झाडांच्या बियांकडे गेले. खेळता खेळता या चिमुकल्यांनी त्या बिया खाल्ल्या.
काही वेळातच बालकांना उलट्या, मळमळ आणि अस्वस्थतेचा त्रास जाणवू लागला. एकाच वेळी अनेक मुलांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तातडीने धाव घेतली. सर्व आठ बालकांना उपचारासाठी धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय उपचार सुरू असतानाच निर्मला बिज्या वळवी (वय ४ वर्षे) या बालिकेची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. तिच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेतून बचावलेल्या सात बालकांवर सध्या धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, त्यापैकी एका बालकाची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्याला अधिक उपचारांसाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सुंदर कुवरसिंग वळवी (वय ३ वर्षे), विवेक पिंट्या वळवी (वय ४ वर्षे), जिंता सुभाष वळवी (वय ३.५ वर्षे), विकी धनवरसिंग पाडवी (वय ३ वर्षे), किरण सुभाष वळवी (वय २.५ वर्षे), मनोज बिज्या वळवी (वय ५ वर्षे) आणि पंकिता इसऱ्या पवार (वय ४ वर्षे) अशी उपचार सुरू असलेल्या बालकांची नावे आहेत.
लहान मुलांवर देखरेख ठेवण्यासाठी घरात मोठी व्यक्ती नसताना घडलेल्या या दुर्घटनेने ग्रामीण भागातील स्थलांतरित मजूर कुटुंबांसमोरील बालसंगोपनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. एरंडीच्या बिया खाल्ल्याने एकाच वेळी आठ बालकांना विषबाधा होऊन एका निष्पाप बालिकेला जीव गमवावा लागल्याने मोडलगाव परिसरात शोककळा पसरली आहे.







