चिपळूण: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या चिपळूण नगर परिषदेच्या महत्त्वाकांक्षी ग्रॅव्हिटी पाणी योजनेचे काम आता ४० टक्के पूर्ण झाले असून, मे २०२७ अखेरपर्यंत ही योजना पूर्ण करून घराघरात पाणी पोहोचवले जाईल, असा ठाम विश्वास नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी व्यक्त केला आहे. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सोमवार, ५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या नगर परिषदेच्या विशेष सभेत या पाणी योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पूर्वीची प्रकल्प सल्लागार समिती बदलल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला अपेक्षित वेग प्राप्त झाला असून, नाशिक येथील नव्याने नियुक्त केलेल्या कंपनीच्या तांत्रिक अधिकाऱ्यांनी या सभेत योजनेचा संपूर्ण आराखडा आणि वस्तुस्थिती सभागृहासमोर मांडली.
सभेत मुख्याधिकारी संजय जाधव यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार, कोळकेवाडी धरणाच्या आउटलेटपासून कामावर मुख्य लक्ष केंद्रित केले जाणार असून पहिल्या टप्प्यात ८०० मीटरचे काम हाती घेण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. सध्या पिंपळी येथील वाशिष्ठी डेअरीपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून पेढांबे परिसरातील अपूर्ण काम तसेच पिंपळी ते खेर्डी दरम्यानची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गाच्या परवानग्या पुढील ३० ते ३५ दिवसांत मिळवून घेतल्या जातील, अशी ग्वाही संबंधित समितीने दिली आहे. दरम्यान, निधीच्या उपलब्धतेतील अडचणी लक्षात घेऊन शहरातील नव्या नळजोडण्या आणि वॉटर मीटर बसविण्याचे काम सर्वात अंतिम टप्प्यात करण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे.
या योजनेतील महत्त्वाच्या तांत्रिक मुद्द्यावर अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ग्रॅव्हिटी पद्धतीने येणारे पाणी केवळ ७ मीटर उंचीपर्यंतच थेट पोहोचू शकणार आहे; त्यामुळे चार ते पाच मजली गृहसंकुलांमधील नागरिकांना नेहमीप्रमाणे मोटारीच्या साहाय्यानेच पाणी वर चढवावे लागेल. याच सभेत नगरसेवक प्रमोद बुरटे यांनी शहरातील पाणी वितरणातील त्रुटींवर बोट ठेवले. अनेक ठिकाणी बेकायदा विद्युत पंप लावून नळाचे पाणी उपसले जात असल्याने, स्वतः नगरसेवक असूनही पेठमाप येथील आपल्या घरात पुरेसे पाणी येत नसून सार्वजनिक नळावर अवलंबून राहावे लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. पाणीपुरवठा विभागाने तातडीने शहरात सर्वेक्षण मोहीम राबवून बोगस नळकनेक्शन आणि अनधिकृत विद्युत पंप जप्त करावेत, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.






